शिवसेनेशी जाहीर वाद टाळा : अमित शहा
मुंबई:राज्यात सत्तेत असूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात कुरबुरी सुरूच असतात. शिवसेना तर रोजच भाजपवर जहरी टीका करत असते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप नेत्यांना शिवसेनेला जाहीर प्रत्युत्तर देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. सह्याद्री वर रात्री उशिरा शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांची अडीच तास खलबते झाली. यावेळी अमित शहा यांनी ही सूचना केल्याचे समजते.शिवसेनेशी जाहीर वाद टाळला जावा, यावर बैठकीत एकमत झाल्याचे सांगण्यात आले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत असेल. ही निवडणूक युती करूनच लढवू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच विरोधकांची महाआघाडी हा भ्रम आहे. महाआघाडी अस्तित्वातच नाही. ते सर्व प्रादेशिक पक्ष आहेत आणि २०१४ ला आम्ही त्यांचा पराभव केला आहे. ते एकत्र येऊ शकत नाहीत, असा घणाघात करतानाच २०१९ ची निवडणूकही आम्हीच जिंकू, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
यापूर्वी भाजपकडे सहा राज्यांची सत्ता होती. आता सोळा राज्यांत आहे. मग लोकसभा निवडणूक कोण जिंकेल, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षेची आम्ही बाळगलेली हमी, भ्रष्टाचाराचा खातमा आणि आठ कोटी शौचालयांची उभारणी आणि अडीच कोटी घरांमध्ये केलेली विजेची व्यवस्था या मुद्यांवर निवडणूक लढवणार आहोत, असे अमित शहा यांनी सांगितले. मजबूत सरकार सत्तेत येणे ही देशाची गरज आहे.
बैठकीत तीन राज्यांतील पराभवावरही चर्चा झाली. मात्र त्याचा लोतसभा निवडणुकीशी संबंध जोडता येणार नाही, असे मत शहा यांनी व्यक्त केले.