माजी मुख्यमंत्र्यांनी तरी राज्याची बदनामी करू नये : मुंनगंटीवार

माजी मुख्यमंत्र्यांनी तरी राज्याची बदनामी करू नये : मुंनगंटीवार

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अन्य नेत्यांप्रमाणे विषय समजून न घेता, आपल्या सोयीची माहिती काढून पत्रकार परिषदा घेत सुटले आहेत. निवडणुकीच्या वर्षांत त्यांचा हा अट्टाहास असू शकतो, पण महाराष्ट्राची बदनामी निदान माजी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने तरी करू नये, असे राज्याचे अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आजही सर्वाधिक स्टार्ट अप हे महाराष्ट्रातच आहेत. पीएमओत काम केलेल्या मंत्र्यांनी तरी अहवालातील सोयीचे तेवढे अर्थ काढायचे नसतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या अहवालाचा संदर्भ घेत पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत, त्याच अहवालात देशात एकूण १४,०३६ स्टार्टअप मान्यताप्राप्त आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक २७८७ स्टार्टअप हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राने फेब्रुवारी २०१८ मध्ये स्टार्ट अप धोरणाची घोषणा केली आणि डीआयपीपीने जे रँकिंग जाहीर केले, ते मे २०१८ पर्यंत या धोरणाच्या केलेल्या इव्हॅल्यूशनवर आधारित आहेत. या धोरणाचे इव्हॅल्यूशन करण्यासाठी केवळ २ महिन्यांचा अवधी लाभल्याने, महाराष्ट्राला इमर्जिंग वर्गवारीत टाकले आहे. ही वर्गवारी धोरणाच्या असेसमेंटची आहे, सर्वाधिक स्टार्टअप कोणत्या राज्यात आहे, याची नाही. सर्वाधिक स्टार्टअपच्या माध्यमातून महाराष्ट्र हेच स्टार्टअप कॅपिटल बनले आहे. त्यामुळे केवळ सोयीची आकडेवारी सांगून दिशाभूल करू नका, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले आहे.

चव्हाण यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या मानांकनाचा. सिंगापूरच्या ली कॉन यू या जगविख्यात संस्थेने महाराष्ट्र हेच इज ऑफ डुईंग बिझनेसमधील अग्रणी राज्य असल्याचे आपल्या अहवालात सांगितले आहे. डीआयपीपीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हे मानांकन दोन आधारावर करण्यात आले. एक प्रत्यक्ष कम्लायन्स आणि दुसरे परसेप्शन. डीआयपीपीने ज्या सुधारणा करण्यास सांगितल्या, त्यात महाराष्ट्राने ९७ टक्के बाबींची पूर्तता केली आहे. पण, आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात येत असल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे परसेप्शन इंडेक्समध्ये महाराष्ट्राला ९३ टक्के गुण मिळाले.औद्योगिक विकास दरात सुद्धा महाराष्ट्र हेच अग्रणी राज्य असून, आजही देशाच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे. संपूर्ण देशाचा औद्योगिक विकास दर ४.४ टक्के असताना राज्यात ६.५ टक्के इतका विकास दर आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीने तरी किमान महाराष्ट्राची बदनामी होईल, अशी चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल करू नये, असे  मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

Previous articleराज्य सरकारचे  औद्योगिक धोरणाकडे  दुर्लक्ष :  पृथ्वीराज चव्हाण
Next article…..गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी सभागृह झाले भावूक