भाजप शिवसेनेने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा:दानवे
नागपूर:जागावाटप खड्ड्यात गेले, युतीबाबत नंतर बघू असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार फटकारे खाल्ल्यानंतरही भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरूच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप शिवसेनेने एकत्र लढावे, ही जनतेची इच्छा आहे, असे वक्तव्य केले. शिवसेनेने अर्ध्या जागा मागितल्या असून तसा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर
दानवे म्हणाले की, अजून युतीची चर्चा सुरूच झालेली नाही. तर जागा वाढवून मागण्याचा सवालच निर्माण होत नाही. राफेल घोटाळ्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पहारेकरीही चोऱ्या करू लागला आहे, या आरोपावर दानवे म्हणाले की, कोर्टाचा निर्णय आला आहे. त्यामुळे हा विषयच उरला नाही. ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर एकापेक्षा एक जहाल आरोप करूनही भाजपने नमते घेतले आहे. शिवसेना युती करणारच, असा विश्वास भाजपला वाटत असल्याचे दानवे यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही शिवसेनेशी जाहीर वाद टाळा, अशा सूचना दिल्याने भाजपकडून शिवसेनेवर टीका केली जात नाही. कांदा प्रश्न, राम मंदिर, राफेल प्रकरणी ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक टीका केली आहे. तरीही भाजपने मनधरणीचेच धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.