उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्यास मनसेकडून बक्षीस
मुंबई:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पंढरपूर येथे केलेल्या भाषणात भाजपला विविध प्रश्नांवर जोरदार फटकारले. मात्र मनसेने ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्यास मनसेने १५१ रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की,ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाजपवर निशाणा साधला. परंतु ठाकरे काय म्हणाले हे कुणालाच कळले नाही.
काही दिवसांपूर्वी ठाकरे म्हणाले की, पंचवीस वर्षे आमची युतीत सडली. आता म्हणतात युती करायची की नाही हे जनताच ठरवेल. आम्हाला कोणत्याही फॉर्म्युल्यात रस नाही, हे त्यांचे बोलणे न कळण्यासारखे आहे, असे देशपांडे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील भाषणाचे जो कुणी विश्लेषण करेल आणि आम्हाला अर्थ समजावून सांगेल त्याला १५१ रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. जागावाटप गेले खड्ड्यात, युतीचे नंतर बघू, अगोदर राज्यातील शेतकऱ्यांकडे बघा, असे ठाकरे यांनी काल म्हटले होते. भाजपवर कितीही कठोर टीका केली तरीही युती न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला नाही. ठाकरे कालच्या सभेत सरकारचा पाठिंबा काढून घेतील, असे समजले जात होते. पण तसे काही घडलेच नाही. मनसेने म्हणूनच खिल्ली उडवली आहे.