कर्जतच्या तौसिफ शेखच्या मृत्युस प्रशासनच जबाबदार : धनंजय मुंडे
अहमदनगर : कर्जत शहरातील तौसिफ शेख याच्या मृत्युस कर्जतच्या मुख्याधिकार्या पासून ते तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्वतः जिल्हाधिकारी हे जबाबदार आहेत. प्रशासनातील या अधिका-यांच्या बेपर्वाहीमुळे तौसिफचा बळी गेला असून, या सर्वांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे केली आहे.
कर्जमधील एका मुस्लिम समाजाच्या देवस्थानासमोरील अनाधिकृत बांधकामे काढल्यास आत्मदहन करण्याचा इशारा तौसीफ शेख याने दिला होता, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे २१ डिसेंबर रोजी तौसीफ शेख याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केले, भाजलेल्या अवस्थेत त्याला उपचार व्यवस्थित मिळु न शकल्याने त्याचा मृत्यु झाला. या घटनेचे कर्जतमध्ये तिव्र पडसाद उमटले आहेत.
धनंजय मुंडे यांनी आज कर्जत येथे तौसीफ शेख याच्या कुटुंबियांची भेट घेउन सांत्वन केले, तसेच समाजबांधवांची चर्चाही केली. तौसीफ शेख हा समाजाच्या न्यायासाठी झगडत होता, प्रशासनाने त्याच्या रास्त मागणीची वेळीच दखल घेतली असती, तर त्याचा बळी गेला नसता, यास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच विभागीय अधिकारी, मुख्याधिकारी हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून खुनाचा गुन्हा दाखल करावा , तौसिफच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत करावी, त्याच्या पत्नीस शासकीय नौकरीत घ्यावे, व या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी यानंतर पत्रकारांशी केली,
या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशीही भेट घेऊन या मागण्या करणार असल्याचे व तौसिफसाठीच्या लढ्यात शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत नगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र फालके, राजेभाऊ गंड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नगर जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार न करणारे डॉक्टरही जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली.
येथील स्थानिक आमदार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच मतदार संघात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही त्यांना या कुटुंबियास भेट देण्यास त्यांना चार दिवस लागतात, याचाच अर्थ त्यांच्या पाठींब्यामुळे तर प्रशासनाने तौसिफच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही का ? असा प्रश्न उपस्थित करीत मंत्री राम शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.