सोनिया, राहुल गांधीच देशाचे नेतृत्व करण्यास योग्य : शरद पवार
सातारा:देशाचे नेतृत्व करण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधी यांचेच नेतृत्व योग्य आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केले. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्यावरून १९९९ मध्ये पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. परंतु आज त्यांनी सोनिया आणि राहुल यांचे नेते म्हणून कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पवार म्हणाले की, गांधी घराण्यातील दोन पंतप्रधानांच्या हत्या झाल्या. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतरही सोनिया गांधी नेत्या म्हणून पुढे आल्या. आता राहुल गांधी चांगले नेतृत्व करत आहेत.पाटण येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली.
पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. गेली साडेचार वर्षे सत्ता असताना मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही.विकासाचे जे स्वप्न दाखवले त्यातील काहीच केले नाही.जनता आपल्यापासून दूर जात आहे, हे पाहून आता मोदींना रामाची आठवण झाली आहे,असे पवार म्हणाले.
भाजपचा समाचार घेताना पवार यांनी सांगितले की,आज देशातील वातावरण बदलले आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी असे वातावरण निर्माण केले गेले की वाटले काहीतरी भयंकर करून दाखवणार आहेत.आपण त्यांना संधी द्यावी, आणि लोकांनी संधी दिली.धार्मिक आणि जातीयवादाचा पुरस्कार करणारे राज्यकर्ते आता देशात आहेत, हे लोकांच्या लक्षात आले आहे.राम मंदिराच्या नावाखाली राजकारण केले जात आहे, असे पवार यांनी सांगितले.