सरकारमुळे शेतकऱ्यांवर अॅंजिओप्लास्टीची वेळ : विखे पाटील

सरकारमुळे शेतकऱ्यांवर अॅंजिओप्लास्टीची वेळ : विखे पाटील

नाशिक: राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारमुळे शेतकऱ्यांवर अॅंजिओप्लास्टीची वेळ आली आहे, असा हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये एका आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विखे पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

विखे पाटील म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने आधीच शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडवले आहे. भाजप सेनेचा समाचार घेताना ते म्हणाले की, कांद्याला ४० ते ५० पैसे किलोमागे भाव मिळत आहे. इतक्या मोठ्या संकटात शेतकरी सापडला असला तरीही सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत सामान्य नागरिकांचे आरोग्य यांनी धोक्यात आणले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखे पाटील यांनी कडक टीका केली. सत्तेत राहून भाजपवर टीका करतात. पण सत्ता सोडायचे नाव घेत नाहीत. निवडणुका जवळ आल्या की आता भाजपबरोबर शिवसेनेलाही राम आठवायला लागला आहे. एरवी राम मंदिर कुणालाही आठवत नाही, असे विखे पाटील म्हणाले.

हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. कॉंग्रेस सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने योजना आणली. या सरकारने फक्त नाव बदलून कॉंग्रेसच्या काळातीलच योजना पुढे राबवल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने नोटबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबर सामान्यांचे जीवनही तणावग्रस्त झाले आहे, असे ते म्हणाले.

Previous articleसोनिया, राहुल गांधीच देशाचे नेतृत्व करण्यास योग्य : शरद पवार
Next articleमुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर ७ लाखांचा खर्च