नववर्ष साजरे करण्यासाठी बाजारपेठा चोवीस तास खुल्या ठेवा : आदित्य ठाकरे
मुंबई: मुंबईसह ठाणे, नवी मुंबई वगैरे अनेक शहरांमध्ये नागरिकांना खास करून युवा वर्गास नवीन वर्ष जल्लोषात साजरे करण्याची इच्छा असते.मात्र करमणुकीची ठिकाणे रात्री एक वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा नियम आहे. युवा वर्गाला नववर्षाचा आनंद पूर्णपणे लुटता यावा, यासाठी बिगर रहिवासी भागातील बाजारपेठा चोवीस तास खुल्या ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की,मुंबई आणि इतर शहरे चोवीस तास खुली रहावी या महापालिकेत मंजूर झालेल्या प्रस्तावाला २०१५ मध्ये मुंबई पोलिस आयुक्तांनी संमती दिली होती. हा प्रस्ताव २०१७ मध्ये विधानसभेत मंजूर झाला. काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी तो पडून आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई चोवीस तास खुली ठेवल्यास या ठिकाणांवरून राज्याला महसूल मिळेल आणि भूमिपुत्रांना रोजगारही मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. जे दिवसा कायदेशीर आहे ते रात्री बेकायदेशीर कसे होऊ शकते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मॉल्स आणि नियमित जागा चोवीस तास खुल्या राहणे राज्यासाठी वरदान ठरेल. आपल्या नागरिकांवर विश्वास ठेवा. तणावपूर्ण जीवन आणि धावपळीच्या जगण्यातून विरंगुळा म्हणून अशा जागा चोवीस तास खुल्या राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आता त्यांची विनंती मान्य करतात का याची उत्सुकता आहे.