कॉंग्रेस आणि भाजप हे एकाच माळेचे मणी : आंबेडकर

कॉंग्रेस आणि भाजप हे एकाच माळेचे मणी : आंबेडकर

मुंबई:कॉंग्रेस येत्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी पायघड्या घालण्यास तयार असली तरीही आंबेडकर मात्र कॉंग्रेसच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच कॉंग्रेस आणि भाजपला जोरदार फटकारले आहे. आंबेडकर म्हणाले की,कॉंग्रेस आणि भाजप हे एकाच माळेचे मणी आहेत. कॉंग्रेस आम्हाला एमआयएमशी युती तोडण्यास सांगत असली तरी आम्ही एमआयएमशी संबंध तोडणार नाही. तसेच आम्ही कॉंग्रेसकडे जागा मागण्यासाठी जाणार नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसने नेहमीच प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत, असे म्हटले आहे. मात्र त्यासाठी आंबेडकर यांनी एमआयएमची साथ सोडली पाहिजे, अशी अट घातली आहे. मात्र आंबेडकरांना ती मान्य नाही. एमआयएमसह आम्हाला महाआघाडीत स्थान दिले तर आमच्या वाट्याच्या काही जागा त्यांच्यासाठी सोडू, असेही आंबेडकर यांनी सांगितले. महाआघाडीबाबत आमची चर्चा होती तेथेच आहे, असेही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसकडे १२ जागा मागितल्या आहेत. पण कॉंग्रेसला तितक्या जागा देणे शक्यच नाही. केवळ अकोला लोकसभेची जागा कॉंग्रेसने आंबेडकरांसाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र एका जागेसाठी आंबेडकर महाआघाडीत जाण्याची शक्यताच नाही. लोकतांत्रिक जनता पक्षाचे कपिल पाटील यांनीही छोटे मित्र पक्ष काय वाजंत्री वाजवण्यासाठी आहेत का, असे पत्र लिहून महाआघाडीत आधीच बिघाडी झाल्याचे संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या आजच्या वक्तव्याने तर त्याची खात्रीच पटली आहे.

Previous articleमुख्यमंत्री कार्यालयाची बिल्डरांसोबत १० हजार कोटींची ‘डिल’ : विखे पाटील
Next articleठाकरे चित्रपटाच्या माध्यमातुन भावनिक मत मागण्याचा प्रयत्न : पवार