राष्ट्रवादीच्या आमदारासह नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई : अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपाला पाठिंबा देणे स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना महागात पडण्याची शक्यता आहे.पक्षादेश धुडकावून महापौर निवडणुकीत भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना साथ देणा-या नगरसेवकांनासह स्थानिक आमदार संग्राम जगताप आणि जिल्हाध्यक्षांना राष्ट्रवादीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास पक्षातून निलंबित केले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
आज झालेल्या अहमदनगरच्या महापौरपदी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अपक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांनी ३७ विरुद्ध शून्य मतांनी विजय मिळवला.अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १८ जागा मिळाल्या आहेत. आजच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी भाजपला साथ दिली आहे. राष्ट्रवादीने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे महापौरपदाचे स्वप्न भंग झाले.मात्र आता भाजपला पाठिंबा देणे राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारासह १८ नगरसेवकांना महागात पडणार आहे. १८ नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत भाजपाला साथ दिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तसेच अहमदनगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नगरसेवकांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांना पक्षातून निलंबन केले जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते मलिक यांनी दिली आहे.