खुशखबर ! एसटीत वाहक चालकांची ४ हजार २४२ पदांची भरती
मुंबई : राज्यातील १५ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना मोठा दिलासा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील विविध जिल्ह्यातील ४ हजार २४२ चालक वाहक पदांची भरतीची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.या भरतीत इतर आरक्षणासह मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा या हेतूने एस.टी महामंडळाने या जिल्ह्यात एस.टी महामंडळात ४ हजार २४२ वाहक चालकांची भरती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने औरंगाबद,बीड,जालना, लातूर,नांदेड, उस्मानाबाद, परभणी,अमरावती,अकोला,बुलढाणा, यवतमाळ, धुळे,जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु यापैकी ११ जिल्ह्यात ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत.बीड,लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात चालक आणि वाहक पदांच्या रिक्त जागा नसल्या तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील बरोजगार पात्र युवकांची निवड करण्यात येवून त्यांना ज्या जिल्ह्यात जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. या भरतीत इतर आरक्षणासह मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, लवकरच याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती रावते यांनी दिली.तसेच इतर जिल्ह्यातील विविध रिक्त पदांचा आढावा घेवून जाहिरात काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ही होणारी भरती कायमस्वरूपी तत्वावरील असल्याने या भागातील बेरोजगार युवक युवतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून, या पदांसाठी अर्ज करणा-या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परिक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेतील ५६० पदांसाठी १५ हजार रूपयांची ठोक रक्कम आणि वार्षिक ५०० रूपयांची वाढ या पद्दतीने ५ वर्षासाठी कंत्राटी पद्दतीने काम करण्याचा विकल्प स्वीकारता येईल असेही रावते यांनी सांगितले.