धनगरांना आरक्षण न मिळाल्यास आकाश पाताळ एक करू :डांगे
लातूर:धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारसाठी निवडणुकीत धगधगता राहणार आहे. माजी मंत्री अण्णा डांगे यांनी याची चुणुक दाखवत इशारा दिला आहे.धनगरांना आरक्षण न मिळाल्यास मराठ्यांप्रमाणे आम्हीही आकाशपाताळ एक करू, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री धनगरांना आरक्षण मिळेल, थोडे थांबा असे सांगत आहेत.पण थोडे थांबा म्हणजे किती थांबायचे? साडेचार वर्षे आम्ही थांबलोच आहोत.त्यांनी आमचा विश्वासघात केला तर येत्या निवडणुकीत आम्ही त्यांचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डांगे यांनी दिला.धनगर आरक्षणासाठी धनगर समाज महासंघाची बैठक लातूरमध्ये आज झाली.धनगरांचे प्रमुख नेते तिला उपस्थित होते.त्यानंतर पत्रकार परिषदेत डांगे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच पुढील आठवड्यात धनगर समाजाचे आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही डांगे यांनी दिली.
आमचे सरकार आले तर पहिल्याच बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.म्हणून धनगर समाजाने भाजपला मतदान केले.पण साडेचार वर्षे झाली तरी आरक्षण मिळालेच नाही, असे डांगे म्हणाले. धनगरांना आरक्षण घटनेत असूनही दिले जात नाही.पण जे घटनेतच नाही असे आरक्षण ताकदीचा जोर दाखवल्यामुळे दिले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143