नारायण राणे लोकसभा निवडणुक स्वबळावर लढणार !

नारायण राणे लोकसभा निवडणुक स्वबळावर लढणार !

कणकवली: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे ठरवले आहे. आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढवायच्या याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले.मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कणकवलीतील पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीतही भाजपला पाच राज्यांप्रमाणेच धक्का बसेल, असेही राणे म्हणाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे अजून लहान आहेत. त्यांना राजकारण कळत नाही. मी एनडीएचा घटक आहे, असे राणे यांनी सांगितले. राणे यांना राष्ट्रवादीतर्फे लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कणकवलीत जाऊन त्यांची भेटही घेतली होती. पण राणे यांनी पवारांसोबत राजकीय चर्चा झाली नव्हती, असे आज स्पष्ट केले.
गृह राज्यमंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर राणे यांनी टीकेचे प्रहार केले. केसरकर कर्तृत्वशून्य असल्याने नाना पाटेकरांना जिल्हा दत्तक घ्यायला सांगत आहेत. उद्या ते राज्यही विकायला काढतील, असा आरोप राणे यांनी केला.जिल्ह्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला केसरकरच जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. राणे स्वत: उमेदवार असतील का, याचे उत्तर मात्र राणे यांनी दिले नाही. कोणतेही आश्वासन पाळले नाही. म्हणून पाच राज्यात भाजपचा पराभव झाला, असे राणे म्हणाले.

दरम्यान राणे यांची कोकणात ताकद मोठी असल्याने त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय शेवटपर्यंत टिकवल्यास त्याचा फटका सर्वच पक्षांना बसू शकतो. राणे यांचा उमेदवार स्वत:निवडून आला नाही तरीही शिवसेना आणि कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीला फटका बसू शकेल. युतीचे जागावाटप झाले तर ही जागा शिवसेनेकडे आहे. जागावाटप झाले नाही तरीही शिवसेनेलाच फटका बसणार आहे कारण भाजपची ताकद नगण्य आहे.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांना मिळणार मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची रजा
Next articleपंकजा मुंडेंमुळे परळीत रूजली सांस्कृतिक चळवळ