मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाः खा. अशोक चव्हाण
मुंबई : राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भीमा कोरेगाव दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉम्ब निर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकारपरिषद घेतली नाही. पण आज ऑगस्टा वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे चोराच्या उलच्या बोंबा असून त्यांनी राज्यातल्या प्रश्नांवर आणि राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरही पत्रकारिषदा घ्याव्यात अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. अशोक चव्हाण यांनी पुराव्यासह मुख्यमंत्र्यांचा खोटया आरोपांचा पंचनामा केला. ते म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी पत्रकारपरिषदा घेऊन खोटे आरोप करण्याचा कार्यक्रम भाजपने सुरु केला आहे. आजची मुख्यमंत्र्यांची परिषद हा त्याचाच भाग आहे. ख्रिश्चन मिशेलच्या मागे लपून भाजप सरकार आपला भ्रष्टाचार आणि घोटाळे लपवण्याचा प्रयत्न करत असून काँग्रेस सरकारने ऑगस्टा वेस्टलँडला ब्लॅकलिस्ट करून घातलेली बंदी उठवून मेक इन इंडियात सहभागी का करून घेतले याचे उत्तर मोदींनी द्यावे.