संयुक्त जनता दलाचा तिढा सोडवण्यासाठी कॉंग्रेस धावली पवारांकडे
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सर्वच पक्ष संकटमोचक म्हणून पाहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आपण पवारांचा हात धरूनच राजकारणात आल्याचे सांगितले आहे.पण कॉंग्रेससह सर्वच पक्ष पवारांकडे सल्ल्यासाठी धावतात. आता कर्नाटकातील तिढा अवघड झाल्याने कॉंग्रेसने शरद पवारांकडे पेच सोडवण्यासाठी धाव घेतली आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे स्वत: पंतप्रधान बनू शकतील किंवा चाणक्य बनतील, असे अंदाज सर्वांनीच वर्तवले आहेत. भाजपला बहुमतासाठी काही जागा कमी पडू शकतील. त्यावेळी पवार आपला पाठिंबा भाजपलाच देतील, असाही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. पण आजही पवार चाणक्याच्याच भूमिकेत आहेत. कारण धर्मनिरपेक्ष जनता दलाने कॉंग्रेसकडे लोकसभेच्या १२ जागा मागितल्या आहेत. इतक्या जागा कॉंग्रेसला सोडणे अशक्य आहे. म्हणून कॉंग्रेसने हा पेच पवारांच्या दरबारात आणला आहे. हा पेच सोडवण्यासाठी कॉंग्रेसने पवार यांच्याशिवाय एन. चंद्राबाबू नायडू आणि फारूख अब्दुल्ला यांना मदत मागितली आहे.
एनडीए विरोधात विरोधकांना एकत्र आणण्यात कॉंग्रेसला अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी कॉंग्रेसला पवारांची मदत हवी आहे.जेडीएसने १२ जागा मागितल्या असून त्या न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि देवेगौडा यांचे संबंध चांगले असल्याने पवारच त्यांची समजूत काढू शकतील, असे कॉंग्रेसला वाटते. त्यामुळे शरद पवार आता यातून कसा मार्ग काढतात, याकडे कॉंग्रेसचे लक्ष लागले आहे. त्यानंतर पवार यांची चाणक्याची भूमिका आणखी मजबूत होऊ शकते.