मोदींसाठी श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत

संजय राऊत यांचा टोला

मोदींसाठी श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका दीर्घ मुलाखतीत अयोध्येत राम मंदिरासाठी अध्यादेश आणणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावर राम मंदिराचा मुद्दा लावून धरणाऱ्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी यांच्यासाठी प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असा टोला लगावला आहे.

राऊत यांनी म्हटले आहे की, राम मंदिर हा काही तातडीचा मुद्दा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. मोदी यांनी तरी यापेक्षा वेगळे काय सांगितले, अशा शब्दांत राऊत यांनी टोला लगावला आहे. तसेच मोदी यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे अभिनंदनही केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौराही केला. तसेच पंढरपूर येथे ठाकरेंची सभाही घेतली. मात्र भाजपने राम मंदिराच्या मुद्याकडे आणि शिवसेनेच्या मंदिरासाठीच्या आग्रहाकडे फारसे लक्ष द्यायचे नाही, असे ठरवलेले दिसते आहे. त्यामुळेच मोदी यांनी अध्यादेश काढणार नाही, असे सांगून टाकले आहे. आता शिवसेना कितपत आक्रमक भूमिका घेते, याची उत्सुकता आहे.

राम मंदिरासाठी तातडीने अध्यादेश काढा आणि हा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी शिवसेना सतत करत आहे. परंतु भाजपने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आता येत्या काळात भाजप आणि शिवसेना या सत्तेतील भागीदारांचे संबंध आणखी ताणले जातील, अशी चर्चा आहे. शिवसेना कदाचित याच मुद्यावरून सरकारमधून बाहेरही पडू शकते.

Previous articleमोदींची मुलाखत सेटिंग होती : जितेंद्र आव्हाड
Next articleधनंजय मुंडे यांना जोरदार दणका