राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?
शिवसेनेला गोंजारण्याची खेळी
मुंबई: निवडणुका जवळ येत असताना कोणताही धोका पत्करायचा नाही, असे भाजपने ठरवले आहे. त्याचमुळे भाजप लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातेबदल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपमधील नाराजांची वर्णी लावून निवडणुकीच्या तोंडावर कुणीही बंडखोरी करू नये यासाठी भाजप शॉकप्रुफ बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा बेत आहे. त्याचबरोबर विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेलाही गोंजारण्याची खेळीही मुख्यमंत्री करून पाहतील, असेही बोलले जाते.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्याने त्यांच्या जागी नेमणूक करावी लागणार आहे. राज्यात एवढा मोठा दुष्काळ आणि शेतकरी संकटात असताना पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. यावरून विरोधकांनीही सरकारवर कायम हल्ला चढवला आहे. पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडेच कृषी खात्याचा कार्यभार आहे. तो दुसऱ्या कुणाकडे तरी देऊन राज्याला पूर्णवेळ स्वतंत्र कृषीमंत्री मिळू शकेल.
भाजपला निवडणुकांना सामोरे जाताना २०१४ सारखी परिस्थिती नाही, याची जाणीव झाली आहे. तसेच शिवसेनेशीही संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे या बिकट स्थितीत भाजपसाठी संकटमोचक म्हणून येऊ शकतात. म्हणूनच खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशीही चर्चा आहे. मात्र त्यांना पाटील यांच्याकडील महसूल खाते परत दिले जाणार का, याची उत्सुकता आहे. निवडणुकीपूर्वी हा बहुधा अखेरचाच मंत्रिमंडळ विस्तार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर रोज सामनामधून टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला एखादे महत्वाचे खाते देऊन विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेलेल्या मित्र पक्षाला खुश करण्याची एक संधीही मुख्यमंत्री घेतील, असेही बोलले जाते. अर्थात शिवसेनेचे मंत्री जानेवारीत आपल्या खिशातील राजीनामे बाहेर काढणार असल्याच्या बातम्याही फिरत आहेत. शिवसेनेला थोपवून धरण्याचा एक प्रयत्न मुख्यमंत्री करून पाहतील. येत्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी मात्र घडणार आहेत,हे निश्चित आहे.