राज ठाकरे यांचा पुन्हा व्यंगचित्राद्वारे मोदींवर निशाणा
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे.
राज ठाकरे यांनी संपूर्ण मुलाखत सेट केलेली होती आणि प्रश्नही ठरलेले होते, हे व्यंगचित्रातून सुचवले आहे. राज यांनी मोदी यांची मुलाखत मोदीच घेत आहेत, असे चित्रातून दाखवले आहे. आणि मुलाखतकार मोदी दुसऱ्या मोदींना काय विचारू, असा सवाल करत आहेत, असे हे व्यंगचित्र आहे.
मोदी यांच्यावर विरोधकांनी मी पणाचाही आरोप केला. मोदींनी प्रत्येक विषयावर उत्तरे दिली पण त्यात मीपणाच अधिक होता, अशी टीका कॉंग्रेसने केली. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात सर्वत्र भिंतींवरही मोदी यांचेच छायाचित्र लावलेले दाखवले आहे. राज ठाकरे प्रतिस्पर्धी पक्षांना व्यंगचित्रे काढून घायाळ करण्यासाठी प्रसिद्धच आहेत. आताही राज ठाकरेंनी मोदींवर व्यंगचित्र काढून भाजपला डिवचले आहे. आता भाजप राज यांना कोणत्या प्रकारे उत्तर देतो, याची उत्सुकता आहे.याअगोदरही राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जहरी टीका करणारी व्यंगचित्रे काढली आहेत.










