भाजपकडून सेनेला अजून युतीचा प्रस्तावही नाही
रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य
मुंबई: भाजप आणि शिवसेना यांच्यात आगामी निवडणुकीसाठी युती होणार का, असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र युतीबाबत दोन्ही पक्षांमध्येच घोळ सुरूच आहे, असे आता स्पष्ट होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपने अद्याप सेनेकडे युतीकरता प्रस्तावच दिलेला नाही, असे सांगत सर्व चर्चेला पूर्णविराम दिला.
युतीबाबतच्या निर्णयाला कधीही कसलीच कालमर्यादा नसते.गेल्या वेळेस दोन दिवस अगोदर आमची युती तुटली. अजून भाजपने युतीचा कोणताच प्रस्ताव शिवसेनेकडे दिला नाही. फक्त चर्चा सुरू आहे, असे दानवे म्हणाले.
राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे कोडे जनतेला आणि विरोधकांना पडले आहे.शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे ठासून सांगत आहे. तर भाजपचे नेत्यांपासून ते श्वेता शालिनीसारख्या प्रवक्त्यांपर्यंत शिवसेना युती करणारच, असे सांगत आहेत. भाजपने तरीही ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा दानवे यांच्या माध्यमातून घेतला असून स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे युतीबाबत प्रस्ताव देऊन नंतर बोलणी सुरू होतील, असे दानवे यांनी म्हटले आहे. काल दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनाही स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. बोलणी सुरू राहतील पण स्वबळावर लढण्याची तयारीही जोरात करण्याचे डावपेच भाजपने आखले आहेत.










