दीपक सावंतांच्या जागी कोणाला संधी मिळणार ?
नीलम गोऱ्हे,सुजीत मिनचेकरांपैकी एकाला लॉटरी लागणार
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना आपल्या मंत्रिपदाचा लवकरच राजीनामा द्याला लागणार आहे. सावंत हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना फक्त सहा महिने मंत्रिपदावर राहता येते. येत्या ७ जानेवारीला ही मुदत संपत असल्याने सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने सावंत यांच्याऐवजी विलास पोतनीस यांना संधी दिली होती. सावंत यांनी राजीनामाही दिला होता परंतु मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात सावंत यांना मंत्रिपदी राहण्यास सांगितले होते.
सावंत कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहाच महिने त्यांना मंत्रिपदी राहता येते. विधानपरिषदेत मंत्री असताना शिवसेनेने संधी न दिल्याने सावंत यांचे मंत्रिपद खरे तर तेव्हाच धोक्यात आले होते. ७ जानेवारीनंतरही आणखी सहा महिने मुख्यमंत्री मुदतवाढ देऊ शकतात.मात्र सावंत यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे.सावंत शिवसेनेकडून तीन वेळेस पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रीपदी संधी ही दिली. परंतु युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. त्यानंतर ठाकरे यांनी पोतनीस यांना संधी दिली.
दरम्यान शिवसेनेत सावंत यांच्या जागी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, याची चर्चा सुरू आहे. सुजीत मिनचेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा असली तरीही नीलम गोऱ्हे यांचेही नाव आघाडीवर आहे.










