आम्हाला कुणी अल्टिमेटम देऊ शकत नाही: संजय राऊत
मुंबई: भाजपने शिवसेनेला युतीसाठी ३१ जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अल्टिमेटम हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. आम्हाला कुणी अल्टिमेटम देऊ शकत नाही.
शिवसेनेने एक वर्षापूर्वीच कार्यकारिणी बैठकीत स्वबळावर लढण्याचा ठराव मंजूर केला आहे. हीच शिवसेनेची ठाम भूमिका असून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. निर्णयाचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप खासदारांच्या बैठकीनंतर शिवसेनेला अल्टिमेटम दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. त्यावर राऊत म्हणाले की, शिवसेनेला अल्टिमेटम देणारा अजून जन्माला आला नाही. अल्टिमेटम शब्द आमच्या डिक्शनरीत नाही.
शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करत असली तरीही भाजपचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. शहा यांनी आपल्या खासदारांना शिवसेनेची वाट पाहू पण स्वबळावर लढण्याची तयारी करा, अशा सूचना दिल्या आहेत. शिवसेनेने भाजपला युतीबाबत काहीही कळवले नाही. मात्र पडद्याआड युतीकरता बोलणी सुरू असल्याचेही वृत्त आहे.










