विद्यार्थी फक्त मतदान केंद्रांवर चौकीदारी करण्यासाठी हवेत : अदित्य ठाकरे
मुंबई: शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यक्रमाचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना पत्रकारितेच्या एका विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश तावडे यांनी दिले. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. आदित्य यांनी ट्विट करून म्हटले आहे की,मोबाईलवर संवादाचा कार्यक्रम शूट केला म्हणून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश तावडेंनी दिले. पोलिसांनीही तत्परता दाखवत त्याला अटक केली. त्यांना विद्यार्थी फक्त निवडणुकीत मतदान केंद्रांची चौकीदारी करण्यासाठी हवे आहेत.शिक्षण आणि नोकऱ्या याबद्दलचे प्रश्न विचारणारे विद्यार्थी नकोत. अडचणीत आणणारे प्रश्न विचारलेले त्यांना चालत नाहीत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे वाचलेच पाहिजे, असे सांगत आदित्य यांनी हे ट्विट केले आहे.
विनोद तावडे अमरावतीमध्ये एका महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी आले होते. पत्रकारितेचा एक विद्यार्थी त्यांच्या या कार्यक्रमाचे मोबाईलवर चित्रीकरण करत होता. तावडे यांनी लगेच त्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. इतर विद्यार्थ्यांनी दबाव आणल्यावर पोलिसांनी त्याला दूर नेऊन सोडून दिले. या घटनेवर आता तावडे काय स्पष्टीकरण देतात, याची उत्सुकता आहे.










