साडेतीन एकरचे मालक अशोक चव्हाण दोन हजार कोटीचे मालक कसे?
प्रकाश आंबेडकर यांची जोरदार टीका
नांदेड: भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. साडेतीन एकर जमिनीचे मालक असलेले अशोक चव्हाण दोन हजार कोटींचे मालक होतात, अशी टीका त्यांनी केली.धर्मवादी लोकांशी आम्ही लढायचे आणि फायदा मात्र कॉंग्रेसवाल्यांनी घ्यायचा. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त सेक्युलर आहोत, असे आंबेडकर म्हणाले. आम्ही निवडणुकीत उतरल्याने धर्मवादी लोकांचा फायदा होईल असे कॉंग्रेसला वाटत असेल तर त्यांनी आमच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
माळेगाव यात्रेत वंचित आघाडीतर्फे आयोजित एल्गार मेळाव्यात आंबेडकर बोलत होते.कॉंग्रेसबरोबर आघाडी होईल की नाही,हे सध्या सांगता येत नाही. पण भाजप सत्तेवर येऊ नये, याची सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात वंचित बहुजन आघाडीशी बोलणी करण्याचे अधिकार चव्हाण यांना आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
या देशातील दलित-ओबीसी नेहमीच वंचित राहिला आहे. आम्हीही सत्ता खेचून आणू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले पाहिजे. मुस्लिमांची त्यांना साथ आहे.सत्ता स्थापन करण्यासाठी एकजुटीने कामाला लागा, असेही आंबेडकर म्हणाले.










