मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार
नव्या राजकारणाची सुरूवात?
मुंबई: मनसे प्रमुख यांची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी वाढती जवळीक स्पष्ट होऊ लागली आहे. इतकी वर्षे कॉंग्रेसचे कडवे विरोधक राहिलेल्या ठाकरे घराण्यातील राज ठाकरे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात आहेत. निमित्त आहे राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या विवाहाची पत्रिका देण्याचे. येत्या २७ जानेवारीला अमितचा विवाह असून त्याचीच पत्रिका राहुल गांधी यांना राज ठाकरे स्वत: जाऊन देणार आहेत.
कॉंग्रेस आणि ठाकरे घराण्याचे वैमनस्य पूर्वापार आहे. परंतु राज ठाकरे यांची कॉंग्रेसशी जवळीक वाढत आहे हे अलिकडच्या घटनांवरून दिसत आहे.तीन राज्यामध्ये कॉंग्रेसचा विजय झाल्यानंतर राज यांनी राहुल गांधी यांची प्रशंसा केली होती.
मात्र राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार नाहीत. मोदींना मुलाच्या लग्नाची पत्रिका देणार का, असे विचारल्यावर राज यांनी मोदी यांचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे का, असे उत्तर दिले होते. तसेच मोदींइतका देश खड्ड्यात कुणीच घालू शकत नाही, अशी टीका केली होती.
राज ठाकरे यांनी मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करणार असल्याचेही म्हटले होते. राहुल गांधी यांच्या भेटीकडे राजकीय दृष्टीने महत्व आहे. राज आणि राहुल यांच्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.










