राज्यातील शेतकऱ्याला पगार सुरू करणार : चंद्रकांत पाटील

राज्यातील शेतकऱ्याला पगार सुरू करणार : चंद्रकांत पाटील

सांगली : हे शासन महाराष्ट्रातील सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना आधार दिला आहे. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसात आणखी दोन योजना सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतीमाल विकल्यानंतर साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याने शासनाकडे १० हजार, २० हजार ते जास्तीत जास्त ५० हजार रुपये ठेवायचे. त्यानंतर रकमेनुसार दर महिन्याच्या ५ तारखेला शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने ठराविक रक्कम जमा होईल. यामध्ये जर शेतकऱ्याने ३० हजार रुपये ठेवले तर दर महिन्याच्या ५ तारखेला पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने ३ हजार रुपयेप्रमाणे वर्षाला ३६ हजार रुपये जमा होणार. तर शेतकऱ्याने ५० हजार रुपये भरले तर प्रतिमाह ५ हजार रुपये प्रमाणे वर्षाचे ६० हजार रुपये पत्नीच्या खात्यावर जमा होणार. यामध्ये भरलेल्या रकमेपेक्षा १० हजार रुपये जास्त त्यांना मिळणार आहेत. अशा प्रकारची योजना सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा हप्ता भरण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अटल पेन्शन योजनेतून १८ वर्षांच्या तरूण शेतकऱ्याने दरमहा २१० रुपये भरायचे. या रकमेचे ६० वर्षांपर्यंत १ लाख ३ हजार रुपये होतात. ६० वर्षांनंतर त्याला दरमहा ५ हजार रुपये निवृत्तीवेतन, संबंधित शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या पत्नीलाही दरमहा ५ हजार रुपये, तर दोघांच्या मृत्युनंतर मुलाला साडे आठ लाख रुपये एकरकमी मिळण्याबाबत अटल पेन्शन योजना आहे. या योजनेतून राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांच्या हप्ता भरण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमहामानवांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : धनंजय मुंडे
Next articleराज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटले