राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटले

राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटले

निमित्त मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्याचे

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील आजच्या भेटीची आज चर्चा होती. राज ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या विवाहाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर नेऊन दिली. यावेळी राज आणि उद्धव यांची एक तास चर्चा झाली. मात्र ती चर्चा राजकीय होती का, याबाबत काहीही समजू शकलेले नाही. राज आणि उद्धव यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी दु:ख आणि आनंदाच्या प्रसंगी दोघाही भावांमधील नात्याचा ओलावा संपलेला नाही, असे यावरून अधोरेखित झाले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित याचा विवाह येत्या २७ जानेवारीला होत आहे.

राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांना पत्रिका देऊन थांबले नाहीत. ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले. तेथे बाळासाहेब ज्या खुर्चीत बसत त्या खुर्चीवर पत्रिका ठेवली आणि पायाही पडले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी तासभर चर्चा केली. ती कौटुंबिक होती की राजकीय हे गुपितच आहे. मात्र राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केला आहे का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.उद्धव यांच्या घरातून बाहेर पडल्यावर राज जयदेव ठाकरे यांच्याही घरी गेले. जयदेव यांनाही त्यांनी पत्रिका दिली. आपल्या मुलाच्या विवाहाप्रसंगी सर्व ठाकरे कुटुंबियांनी उपस्थित रहावे, ही राज ठाकरे यांची इच्छा आहे.

राज ठाकरे  आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय वैर असले आणि दोघेही एकमेकांवर जहरी टीका करत असले तरी सुखदु:खाच्या प्रसंगी दोघे नेहमीच एकत्र येतात. उद्धव ठाकरे यांना रूग्णालयातून घरी नेण्यासाठी स्वत: राज कार चालवत त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले होते. तसेच राज यांचा मुलगा अमित आजारी असताना उद्धव ठाकरे यांनी आस्थेने विचारपूस केली होती.

Previous articleराज्यातील शेतकऱ्याला पगार सुरू करणार : चंद्रकांत पाटील
Next articleफुले आंबेडकरांचा सरकारला विसर पडणे धक्कादायक