धनगर समाजामुळेच आज आम्ही सत्तेत : पंकजा मुंडे
नांदेड : धनगर समाजामुळे आज आम्ही सत्तेत आहोत हे कदापि विसरणार नाहीत. आरक्षण तर देवूच पण ते मिळेपर्यंत समाजासाठी विकास योजना राबवू तरीही आरक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलन झाल्यास मी सर्वाच्या पुढे राहील, त्यात किंचीतही राजकारण करणार नाही असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज माळेगांव येथे धनगर बांधवांना दिला.
माळेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या जागर महामेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्याचे पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, खासदार डॅा. विकास महात्मे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जीवन बोधेवाड, देविदास राठोड, मुक्तेश्वर धोंडगे, बालासाहेब दोडतले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झाले त्याचा खरा शिल्पकार धनगर समाज आहे, तुमच्यामुळं आज आम्ही सत्तेत आहोत. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता तो पुर्ण करण्यासाठीच मी राजकारणात आले आहे. कॅाग्रेस-राष्ट्रवादी ने समाजाचा विश्वासघात केला पण आम्ही तसे करणार नाही. आरक्षणाचा विषय हा संवैधानिक आहे पण ते मिळेपर्यंत विकासाच्या अनेक योजना राबवून त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देवू असे त्या म्हणाल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हया माझ्या आदर्श आहेत, त्यांनी उत्तम राज्य कारभार केला त्यांचाच आदर्श समोर ठेवून सामान्य माणसांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचा मी प्रयत्न केला आहे. गेल्या ७० वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेसने काहीच दिले नाही त्यामुळे समाजाला न्याय देण्याची आज खरी गरज आहे. समाजाचा युवक स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्यासाठी सरकारने योजना आणली आहे. चौंडी तीर्थक्षेत्र विकासाला मोठा निधी उपलब्ध करून दिला. शिक्षण व आरोग्य यातही न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला पण ते टिकणार नाही म्हणून राष्ट्रवादीचे नेते अपप्रचार करत आहेत. आम्ही आरक्षण दिले तर तुमच्या पोटात का दुखते? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील आम्हीच सोडवणार आहोत. पण तरीही त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्यास मी सर्वात पुढे असेल, त्यात कसलेही राजकारण नसेल. मला सत्तेची लालसा नाही. आरक्षणाचा विषय होईपर्यंत मंत्रालयातील दालनातही प्रवेश करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महादेव जानकर, खा. महात्मे, गणेश हाके, गोविंदराव केंद्रे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’, ‘गोपीनाथ मुंडेंचा विजय असो ‘ या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.