गेल्या पाच वर्षात मागाठाणे विधानसभा मतदार संघाची पिछेहाट : प्रविण दरेकर

गेल्या पाच वर्षात मागाठाणे विधानसभा मतदार संघाची पिछेहाट : प्रविण दरेकर 

मुंबई : यापूर्वी विकासकामात अग्रेसर असलेल्या  मागाठाणे विधानसभा मतदार संघाची गेल्या पाच वर्षात पिछेहाट झाली असल्याची टीका भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
 भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांच्या दहिसर पूर्व  कोकणीपाडा येथील संपर्क कार्यालयाचे आणि अभ्यासीकेचा लोकार्पण सोहळा उत्तर मुंबईचे भाजप खासदार खा. गोपाल शेट्टी यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर रावळपाडा येथे झालेल्या सभेत खा. शेट्टी आणि दहिसरच्या भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मागाठाणेचा विकास करण्यासाठी येथील मतदारांनी आ.प्रविण दरेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन  केले. राज्यात भाजप आणि शिवसेनेची  युती होईल का यावर चर्चा सुरू असतानाच आज रावळपाडा येथे झालेल्या सभेत भाजपच्यावतीने अप्रत्यक्ष प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यापूर्वी  मागाठाणे मतदार संघाचा आमदार असताना आपण विकासकामांचा डोंगर उभा केला होता. सर्वसामान्य जनतेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून अविरतपणे झटल्याचे येथील जनतेने पाहिले आहे.मात्र गेल्या निवडणूकीत येथील जनतेच्या हातुन चुकीची निवड झाली आणि या मागाठाणे मतदारसंघाची गेल्या पाच वर्षात विकासाच्या दृष्टीने पिछेहाट झाली असल्याची टीका आ.दरेकर यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीच्या माध्यमातुन आपली सेवा करण्यासाठी विधानपरिषदेत पाठवून तुमची सहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली आहे. या माध्यमातुन भाजपचा आमदार ,पदाधिकारी उपलब्ध व्हावा या हेतुने या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे असे सांगतानाच, मुंबई महानगरपालिका  शिवसेनेच्या ताब्यात असताना मागाठाणे मध्ये शिवसेनेचा आमदार आणि नगरसेवक  असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सहकार्यामुळे मागाठाणे मतदार संघात दुप्पट प्रमाणात विकासकामे केली असल्याचे आ. दरेकर म्हणाले.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनेक प्रश्न मार्गी लागली आहेत असे सागून, येथील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून वनमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला .त्याला यश मिळाले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अभ्यासिकेला नाहरकत दाखल मिळाला असल्याचे आ. दरेकर म्हणाले.या विभागात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत ते लवकरच  मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आ. दरेकर यांनी दिले. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे माध्यमातुन सेल्फ डेव्हलपमेंट योजना  सुरू  करण्यात आली आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थानी घ्यावा असे आवाहन करतानाच लवकरच या विभागात दोन अद्यावत अभ्यासिका उभारण्यात येणार असल्याची घोषणा आ. दरेकर यांनी केली.

Previous articleधनगर समाजामुळेच आज आम्ही सत्तेत : पंकजा मुंडे
Next articleआरोग्यमंत्री दीपक सावंतांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा