मंत्रालयात तरूणाची स्टंटबाजी !

मंत्रालयात तरूणाची  स्टंटबाजी !

मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी पुण्यातील लक्ष्मण चव्हाण या तरूणाने आज दुपारच्या सुमारास मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळ्यात उडी मारून स्टंटबाजी केली.चव्हाण हा प्रजासत्ताक भारत पक्षाचा अध्यक्ष आहे. मंत्रालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी चव्हाण याला ताब्यात घेतल्यानंतर सुमारे अर्धा तास सुरू असलेली स्टंटबाजी संपली आणि पोलीसांचा जीव भांड्यात पडला.

 धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राषन करून  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर चेंबूर येथील हर्षल सुरेश रावते या तरूणाने मंत्रालायाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्मह्त्या केल्यानंतर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर अशा आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक  जाळ्या लाववण्याचा निर्णय घेवून त्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर आज दुपारच्या सुमारास प्रजासत्ताक भारत पक्षाचा अध्यक्ष लक्ष्मण आण्णासाहेब चव्हाण ( वय ४० वर्षे)  उजनी भुसारी कॅालनी कोथरूड पुणे, याने पहिल्या मजल्यावर जावून मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीवर घरंघळत जात दोन बॅनर बाजूला ठेवून घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.मंत्रालयातील यापूर्वीच्या आत्महत्यांचा प्रसंग पाहता मंत्रालयात आलेले अभ्यागत आणि कर्मचा-यांनी मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर गर्दी केली होती.याची खबर लागताच मंत्रालयात कर्तव्यावर असणा-या पोलीसांनी त्वरीत या ठिकाणी दाव घेतली आणि चव्हाण याला समजविण्याच प्रयत्न केला. मात्र चव्हाण हा आपल्या विविध मागण्यावर ठाम होता.

यावेळी पोलीसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी मंत्रालयात धाव घेतली.या तरूणाला कसे ताब्यात घ्यायचे याचा विचार सुरू असतानाच पोलीस हवालदार बाबासाहेब रणखांबे आणि वन विभागाचे वाहन चालक राजेश नामदार यांनी मंत्रालायाच्या पहिल्या मजल्यावर धाव घेत जाळीवर घरंघळत जात या तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चव्हाण याने या दोघांना अडकाव करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरला. पोलीस हवालदार आणि वन विभागाचे चालक यांनी चव्हाण याला ताब्यात घेवून पोलीसांच्या स्वाधीन केल्यानंतर चव्हाण याचा अर्धा तास सुरू असलेला स्टंट संपुष्टात आला. मंत्रालयातील पोलीसांनी चव्हाण याची चौकशी करून मरिन ड्राईव्ह पोलीसांच्या ताब्यात दिले.

Previous articleआरोग्यमंत्री दीपक सावंतांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा
Next articleकुणाच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही : संजय राऊत