कुणाच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही : संजय राऊत
मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल लातूर येथे बोलताना शिवसेना बरोबर आली तर ठीक नाही तर उठाके पटक देंगे, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना संतप्त झाली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही कुणाच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, असे उत्तर दिले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमकीना जोरदार सुरुवात झाली आहे.
शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. औरंगजेब आणि अफझलखान यांना आम्हीच पटकवले आहे, हे विसरलात का, असे राऊत यांनी म्हटले आहे. कुणाच्या इशारे आणि धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र युतीची अपेक्षा ठेवून असलेल्या दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे टेन्शन मात्र या शाब्दिक चकमकीमुळे चांगलेच वाढले आहे. राऊत यांनी शहा यांच्या वक्तव्यावर अत्यंत जहाल भाषा वापरली आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काल लातूर येथे बोलताना अमित शहा यांनी बोलताना शिवसेनेसोबत युती झाली तर त्यानाही जिंकवू आणि नाही युती झाली तर त्यांना धूळ चारू, असे विधान केले होते. यावर शिवसेना तिखट उत्तर देणार, याची अपेक्षा होती आणि तसेच उत्तर शिवसेनेकडून आले आहे. आता युतीची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे, असे समजण्यात येत आहे. अर्थात ऐन वेळेस काहीही घडू शकते.










