अजित पवारांनी आता शिरुरमधून निवडणूक लढवावीच : आढळराव
पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर या मतदारसंघातून तीन वेळेस निवडून आलेले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांनी आता निवडणूक लढवावीच, असे आव्हान दिले आहे. अजित पवारांनी आता शब्द फिरवू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असल्याने आव्हाने आणि प्रतिआव्हाने यांना जोर चढला आहे. राजकीय घडामोडी विलक्षण वेगाने होत आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार हे निश्चित आहे. आघाडीच्या जागावाटपाप्रमाणे शिरूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे. याच मतदारसंघातून मी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. शरद पवार यांनी होकार दिला तर मी तयार आहे, असे ते म्हणाले. त्यावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, पवार कुटुंब कायमच माझ्या विरोधात राहिले आहे. मी पण मराठ्याची औलाद आहे. त्यामुळे आता पवार यांनी शब्द फिरवू नये आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावीच. शिरूरमध्ये मला कुणीच हरवू शकत नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला आहे.
अजित पवार जर या मतदारसंघातून खरोखरच उभे राहिले तर महाराष्ट्रातील ही एक लक्षणीय निवडणूक असेल आणि संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे असेल. कारण आढळराव पाटील हे तीन वेळा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.










