जनतेच्या मनात सत्ता परिवर्तनाची चाहुल : नवाब मलिक
मुंबई : केंद्र आणि राज्यसरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. लोकांच्या मनात कुठेतरी सत्ता परिवर्तन झाले पाहिजे असं वाटायला लागले आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनाचा ही संपर्क यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
देशातील केंद्र सरकारला ५६ महिने तर राज्यातील सरकारला ५० महिने पूर्ण झाले परंतु कुठल्याही आश्वासनांची पूर्तता हे सरकार करु शकलेले नाही. ही सत्य परिस्थिती आहे. लोकांच्या मनात मोदींनी दिलेली आश्वासनांची पूर्तता झाली नाही. राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद चले चलो मोदीजी के साथ अशी घोषणा देवून बरीच आश्वासने दिली होती. परंतु एकंदरीत केंद्र आणि राज्यसरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरले आहे असा आरोपही मलिक यांनी केला.
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून आणि त्यांना वंदन व आर्शिवाद घेवून सुरुवात केली जाणार आहे. तर महाड येथे चवदार तळयाच्याठिकाणी पहिली सभा घेतली जाणार आहे. पहिला टप्पा १० ते १४ जानेवारी असा असणार आहे. कोकणातील रायगड-महाड, गुहागर, खेड, कर्जत, नवीमुंबई, ठाणे, विक्रमगड, मुरबाड, उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण, कल्याण, अंबरनाथ येथे जाहीर सभा होणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.दुसरा टप्पा हा १६ जानेवारीपासून नाशिकपासून सुरु होणार आहे.त्याची माहिती दिली जाईल. तिसरा टप्पा विदर्भात होणार आहे. या संपर्क यात्रेतून केंद्र आणि राज्यसरकारने जनतेला जी आश्वासने दिली होती त्याची आठवण करुन देण्यासाठी आणि जनतेला राजकीय काय परिस्थिती आहे याची माहिती दिली जाणार आहे असेही मलिक यांनी सांगितले.