उद्या मोदी सोलापुरात तर उद्धव ठाकरे मराठवाड्यात

उद्या मोदी सोलापुरात तर उद्धव ठाकरे मराठवाड्यात

भाजप-शिवसेना करणार शक्तीप्रदर्शन

मुंबई: निवडणुकीचे पडघम आता कर्कश्यपणे वाजू लागले असून महाराष्ट्रात नेत्यांचे राजकीय दौऱ्यांचे सत्र सुरू होत आहे. उद्या बुधवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमधून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. तर उद्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. भाजप आणि शिवसेनेचे सर्वोच्च नेते काय बोलणार, याची कमालीची उत्सुकता राज्यात आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. सर्वच जण हे गृहित धरून चालले आहेत. शिवसेना यापूर्वी भाजपवर एकतर्फी कठोर टीका करत होती. पण आता भाजपनेही तसेच आक्रमक भाषेत उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लातुरात शिवसेनेला उचलून आपटण्याची भाषा केली. शिवसेनेला अशी भाषा ऐकण्याची सवय नाही. त्याचबरोबर पंढरपूरच्या सभेत ठाकरे यांनी मोदींना चोर म्हटल्याने भाजप कमालीचा बिथरला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि ठाकरे यांचे दौरे होत आहेत.

उद्धव ठाकरे यांची उद्या सकाळी १२ वाजता बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा बालेकिल्ला आहे. यावेळी ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.नंतर ठाकरे जालना येथे जाऊन दुष्काळग्रस्तांना धान्यवाटप करतील.चार वाजता परभणी येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे.पंतप्रधान मोदी सोलापूरमधून उद्याच निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून त्यांच्या सभेची जोरदार तयारी भाजपने केली आहे. अक्कलकोट रस्त्यावरील रे नगरमधील तीस हजार घरकुलांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पार्क स्टेडियमवर जाहीर सभा होत आहे. या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन भाजप करणार आहे.

Previous articleकेंद्र आणि राज्य सरकारचा पराभव निश्चित:छगन भुजबळ
Next articleकोतवालांच्या मानधनात अडीच हजाराने वाढ