पंकजा मुंडेंनी साधला दोन दिवसांत अडीच लाख लोकांशी संवाद

पंकजा मुंडेंनी साधला दोन दिवसांत अडीच लाख लोकांशी संवाद
लातूर : राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक असलेल्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मागील दोन दिवसांत नांदेड आणि लातूर जिल्हयात झंझावाती दौरा केला. या दोन्ही ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे अडीच लाख लोकांशी संवाद साधला.
रविवारी नांदेड जिल्हयातील माळेगांव येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आरक्षण जागर महामेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या काना कोप-यातून लाखोच्या संख्येने धनगर बांधव याठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्यात आरक्षणाविषयी आत्मविश्वास जागृत केला. या मेळाव्यानंतर लातूर येथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास त्यांनी हजेरी लावली.
सोमवारी सकाळपासून ते रात्रौ उशीरा बारा वाजेपर्यंत लातूर जिल्हयात विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ, लोकार्पण, शेतकरी संवाद यात्रा, कर्मचारी युनियन तसेच भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रत्येक कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सकाळी औसा येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील अकरा कामांचे भूमिपूजन व दोन कामांचे लोकार्पण, पशूवैद्यकीय लघू चिकित्सालय इमारतीचे उद्घाटन करून चारा साक्षरता अभियानाच्या रथाला हिरवा झेंडा त्यांनी दाखवला. मराठवाड्यातील पंचायत समितीच्या सभापती व उप सभापतींशी त्यांनी विकासा बाबत चर्चा केली. भाजपच्या वतीने बस डेपो मैदानात आयोजिलेल्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ करून उपस्थित हजारो शेतक-यांशी संवाद साधत सरकारने शेतक-यांसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजनांची त्यांनी माहिती दिली. चाकूर येथे अहमदपूर चाकूर तालुक्यातील १२६ कोटीच्या कामाचा शुभारंभ त्यांनी केला.
सायंकाळी लातूर शहरातील टाऊन हॅाल येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन व महिला बचतगटांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. युनियनच्या मागण्या तसेच महिला बचतगटांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व कार्यक्रम आटोपून रात्री उशीरा त्या चिंचोली बल्लाळनाथ येथे पोहोचल्या. याठिकाणी लातूर ग्रामीणच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, मेळाव्याला उशीर होवूनही भाजपचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. पंकजा मुंडे यांनी या दोन दिवसांच्या झंझावाती दौ-यात सुमारे अडीच लाख लोकांशी संवाद साधत जन सामान्यांशी असलेली नाळ अधिक घट्ट केली.

Previous articleनगरपंचायत व परिषदेच्या १४१६ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करणार
Next articleदिल्ली आणि मुंबईतील हुकमशाही सरकारविरुद्ध परिवर्तनाची लढाई आहे – मुंडे