बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात कायदेशीर अडचणी

बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात कायदेशीर अडचणी
विरोधी जनहित याचिका दाखल

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात कायद्याच्या अडचणी येत आहेत. दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागी हे स्मारक उभारले जाणार आहे. परंतु या ठिकाणी स्मारक उभारताना पर्यावरण संरक्षणसह अनेक कायद्यांचा भंग केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. सीआरझेड, हरित क्षेत्र आणि वारसा इमारत कायद्यांचेही उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे स्मारक पुन्हा लटकले आहे.

बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्याच्या जागी बांधण्यास हरकत घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात भगवंत रायानी आणि जनमुक्ती मोर्चा यांनी दाखल केली होती. याबाबत अॅड. वाय.पी.सिंह यांनी सांगितले की,सागरी किनारा कायद्यानुसार ही जागा हरित क्षेत्रात आहे. जागेच्या वापरात बदल केला आहे. महापौर बंगला हा वारसा इमारत आहे. कोणतीही वारसा इमारत पाडता येऊ शकत नाही.

बाळासाहेबांचे स्मारक नेहमीच वादात सापडले आहे. यावरून राजकारणही जोरात केले गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली तेव्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बापाचे स्मारक बांधता आले नाही, राम मंदिर उभारतायेत, असा टोला लगावला होता. आता याचिका दाखल केल्यामुळे स्मारकाच्या कामाला कधी सुरूवात होईल, हे सांगणे कठीण आहे.

Previous articleदिल्ली आणि मुंबईतील हुकमशाही सरकारविरुद्ध परिवर्तनाची लढाई आहे – मुंडे
Next articleसवर्णांना आरक्षण निवडणूक समोर ठेवून केलेली जुमलेबाजी