सवर्णांना आरक्षण निवडणूक समोर ठेवून केलेली जुमलेबाजी
जनसंघर्ष यात्रेत कॉंग्रेसची भाजपवर सडकून टीका
नागपूर: गरीब सवर्णांना शिक्षण आणि नोकऱ्यांत जाहीर केलेले दहा टक्के आरक्षण म्हणजे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली जुमलेबाजी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजपवर केली. या आरक्षणाचा सरकारला फारसा फायदा होणार नाही, असे ते म्हणाले.
नागपूर येथून आज कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा निघाली.त्यावेळी चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, म्हणाले की, तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला नसता तर सरकारने जीएसटी कमी करणे आणि आरक्षण असे निर्णय घेतले नसते. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून असे निर्णय घेतले जात आहेत. परंतु गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी,व्यापारी आणि सामान्य जनता यांची अधोगताच झाली आहे.आज नागपुरातील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्यास सुरूवात झाली. मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदी नेते यात्रेला उपस्थित होते.