देशात सत्ता परिवर्तनाचे वारे: विखे पाटील
नागपूर : भाजप-शिवसेनेच्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विश्वासघातामुळे देशभरातील जनता संतप्त असून, नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करून मतदारांनी आपला संताप व्यक्त आला. आगामी निवडणुकींमध्ये देखील परिवर्तनाचे वारे वाहणार असून, या सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा शुभारंभ करतेवेळी प्रसारमाध्यमांनी बोलताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, आज एकही घटक या सरकारच्या कारभारावर संतुष्ट नाही. जनसंघर्ष यात्रेच्या यापूर्वीच्या चारही टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात हेच चित्र दिसून आले. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, बेरोजगारांची फसवणूक झाली आहे, देशभर दडपशाही सुरू असून, याची फळे भाजप-शिवसेनेला पुढील निवडणुकीत भोगावी लागतील, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दिला.
तत्पूर्वी विखे पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आ. नसिम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा, आ. सुनिल केदार, नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे आदी नेत्यांनी दीक्षाभूमीवर घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ केला. ही यात्रा नागपूर विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार असून, १३ जानेवारी रोजी या टप्प्याची नागपुरात सांगता होईल.दीक्षाभूमिवर अभिवादन केल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांनी जनसंघर्ष यात्रेची विशाल मिरवणूक निघाली. यात्रेत सहभागी झालेले सर्व प्रमुख नेते एका खुल्या जीपवर आरूढ होऊन नागरिकांना अभिवादन करीत होते. या यात्रेचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नागरिकांना चौका-चौकात फुले उधळून स्वागत केले. ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरामुळे नागपूर शहर दणाणून गेले होते. या मिरवणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी संत ताजुद्दिन बाबा दर्गा आणि गणेश टेकडी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ही यात्रा कामठीकडे रवाना झाली.