आरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरणार : आरोग्यमंत्री

आरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरणार : आरोग्यमंत्री

मुंबई : आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरू करावी. समाजातील शेवटच्या घटकाला अपेक्षित असलेली चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभागाची आढावा बैठक मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतली.राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले, या क्षेत्रात राज्याचे काम चांगले असून हा मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी अजून प्रयत्न केले जावेत.

विभागातील रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. विविध संवर्गातील १५ हजार पदे रिक्त आहेत ती विहित कालमर्यादेत भरण्यात यावी. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून केमोथेरपी उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळावी यासाठी सर्वच जिल्हा रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होते, ती कमी करण्यासाठी ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी महापालिका जागा देण्यासही तयार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

Previous articleबेस्टचा संप दडपशाहीने चिरडाल तर महागात पडेल: विखे पाटील
Next articleपराभव दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. चव्हाण