समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देणार ?
मुंबई: शिवसेना कितीही झिडकारत असली तरी भाजपने युतीचे प्रयत्न सोडलेले नाहीत. युतीसाठी भाजपने नवा फंडा शोधून काढला असून समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर विचार सुरू केला आहे.
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने पूर्वीच केली आहे.भाजपने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पण युतीसाठी पड खात भाजपने बाळासाहेबांचे नाव देण्याचा विचार सुरू केला आहे.महामार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केले आहेत.शिवसेनेने रोडरोमिओसारखे मागे लागू नका असे झिडकारल्याने शिवसेनेच्या कलाने घेत आणि एकटे लढण्याची तयारी करत भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.
समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन नागपूरमध्ये होत असून पंतप्रधान मोदी त्यासाठी येत आहेत. त्याच वेळेस उद्धव यांनाही आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. शिवसेनेची मागणी पूर्ण केली तर दोन्ही पक्षांतील कमालीचे बिघडलेले संबंध सुधारतील, अशी अटकळ भाजपने बांधली आहे.त्याचमुळे भाजपने वाजपेयींच्या नावाला तिलांजली देऊन बाळासाहेबांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर अंतर आठ तासांवर येणार असून औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते नागपूर अंतर चार तासांवर येणार आहे. सध्या मात्र नाव देण्याचे राजकारण सुरू आहे.