‘वारे शासन तेरा खेल न्याय मांगे तो हो गई जेल’ : भुजबळ

‘वारे शासन तेरा खेल न्याय मांगे तो हो गई जेल’ : भुजबळ

खेड: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे भाजपविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज गुहागर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपल्या अटकेबद्दल ‘ वा रे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो गई जेल’, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

भाजपला त्यांनी अनेक शालजोडीतील टोले हाणले.मला अडीच वर्षे तुरूंगात ठेवले. का पकडले, ते मला माहीत नाही.ज्यांनी पकडले त्यांनाही माहीत नाही, असे म्हणत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली. महाराष्ट्र सदनच्या कामात अगोदर म्हणाले मी पंचवीस हजार कोटी खाल्ले. नंतर म्हणाले मी दहा हजार कोटी खाल्ले. आता शंभर कोटी खाल्ले. शंभर कोटीचे काम होते आणि मी साडेआठशे कोटी खाल्ले, ते कसे मलाच कळत नाही, असे भुजबळ म्हणाले.पाच फुटांची म्हैस गाभण राहिली तर तिला पंधरा फुटांचे रेडकू होईल का, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

भुजबळ सध्या भाजपविरोधात खूपच आक्रमक झाले असून कालही निर्धार परिवर्तन यात्रेत त्यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल करत जोरदार टीका केली होती. तसेच मोदी सगळ्याच बाबतीत फेल झाले आहेत, असे राफेलचा दाखला देत त्यांनी टीका केली होती.

Previous articleसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देणार ?
Next articleभाजप शिवसेनेचे जागा वाटप ठरले ?