भाजप शिवसेनेचे जागा वाटप ठरले ?
सात जागांबाबत पेच
मुंबई: भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही, याबाबत सर्वत्र शंका व्यक्त केल्या जात असताना लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा पुढे सरकल्याचे समजते. सध्याच्या सूत्रानुसार, भाजप आणि शिवसेना २०१४ ला जिंकलेल्या आपापल्या जागांवर लढणार आहेत. गेल्या वेळेस भाजपने २३ आणि शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्याच जागा दोन्ही पक्ष लढवतील. उर्वरित ७ जागांबाबत नंतर तोडगा काढला जाणार आहे.
भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही हा कळीचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. शिवसेना आणि भाजपने अत्यंत आक्रमक भाषेत एकमेकांवर टीका केल्याने युतीची शक्यता संपुष्टात आल्याचा समज होता. परंतु त्याच वेळी पडद्याआडून युतीसाठी हालचालीही सुरू होत्या.नव्या जागावाटप सूत्राबाबत भाजप किंवा शिवसेना यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.मात्र काही दिवसांपासून जी माहिती मिळत आहे त्यावरून या फॉर्म्युल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या निवडणुकीत भाजप शिवसेनेने काही जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या. त्यापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महाआघाडीत गेली आहे. भाजप आणि शिवसेना पराभूत झालेल्या तसेच मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागांबाबत फैसला होणे बाकी आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेशी युती व्हावी, यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याचे समजते.लोकसभेसाठी शिवसेनेची साथ अत्यंत महत्वाची ठरू शकते. म्हणून शिवसेनेशी युतीच्या पडद्याआडून हालचालींना वेग आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर युतीसाठी पक्षातूनच दबाव आहे.अनेक खासदारांना स्वतंत्रपणे भाजपशी लढणे किती अवघड आहे, याची कल्पना आहे. त्यांनी युतीसाठी आग्रह धरला आहे. तसेच ज्यांना निवडणूक लढवायची नाही असे राज्यसभेतील शिवसेना खासदार युतीमध्ये खो घालत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. भाजप आणि शिवसेनेची युती अपरिहार्य आहे, हे युती गेली खड्ड्यात असे उद्धव ठाकरे कितीही म्हणत असले तरीही त्यांच्याही लक्षात आले आहे. युती न केल्यास शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान होवू शकते.