गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही: खडसे
मागे लागलेला शनी कोण आहे ते माहीत आहे
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळातून वगळल्यापासून ते पक्षावर नाराज असून अनेक वेळा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष शरसंधान करत आपली नाराजी व्यक्तही केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे म्हणाले की, मी परिस्थितीला दोष देत नाही, कदाचित माझेही चुकले असेल. पण शनीची साडेसाती लागल्याचे सांगतानाच खडसे यांनी शनी कोण आहे, हेही आपल्याला माहीत आहे, असा टोलाही लगावला. मधल्या कालखंडामध्ये मी जे काही अनुभवले त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागली आहे. अशा गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवले नाही, पण सत्ताधाऱ्यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील, याकडे आमचे सध्या लक्ष आहे, असे खडसे यांनी सांगितले.मात्र लोकसभेसाठी आपण इच्छुक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल. विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर ती लढवण्याबाबत काय तो निर्णय घेऊ, असेही खडसे म्हणाले.
माझ्यासारख्या व्यक्तीने ४० वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केला.त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असा प्रसंग कोणावर येऊ नये. हे मला क्लेशदायक वाटते. जो मनस्ताप मला सहन करावा लागला ती म्हणजे शनीची साडेसाती असल्याचे मला वाटते. तो शनी कोण आहे हे देखील मला माहित असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.