मी बारामतीतूनच लोकसभा निवडणूक लढवणार: जानकर

मुंबई नगरी टीम

अहमनगर: मी दिल्लीत जाण्यास उत्सुक असून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, असे रासपचे अध्यक्ष  महादेव जानकर यांनी आज सांगितले.तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेच्या पाच जागा हव्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पाच जागांसाठी एनडीएकडे आग्रह धरला असल्याचे जानकर म्हणाले.

नगर लोकसभा निवडणुकीत रासप हा एनडीएबरोबरच असेल, याची ग्वाही जानकर यांनी दिली.मात्र लोकसभेला आम्हाला पाच जागा हव्या असून त्यासाठी एनडीएकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बारामती हा माझा प्रेमाचा आणि आवडता मतदारसंघ आहे, असे सांगतानाच जानकर यांनी बारामतीशिवाय मी माढा,परभणी,नगर दक्षिण आणि हिंगोली येथूनहू निवडणूक लढवू शकतो.येणारे सरकारही केंद्र आणि राज्यात भाजपचे असेल आणि रासप त्यात घटक पक्ष असेल, असे जानकर यांनी सांगितले.

२०१४ ची निवडणूकही जानकर यांनी बारामती मतदारसंघातूनच लढवली होती.पण त्यांचा पराभव झाला होता. रासपची पाच जागांची मागणी भाजप मान्य करण्याची शक्यता फार कमी आहे.शिवसेनेशी जागावाटप झाले तर भाजप तेवढ्या जागा देऊच शकत नाही. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तरीही भाजपला रासपची मागणी मान्य करता येणे शक्य नाही.

Previous articleपंकजा मुंडेंची बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला ‘सरप्राईज व्हिजीट’
Next articleभाजप पदाधिकारीच गुंड आणि दहशतवाद्यांची कामे करू लागले : पाटील