मुंबई नगरी टीम
जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे पक्षावर कमालीचे नाराज आहेत. ते नाराज असल्याने पक्षांतर करतील,याचीच प्रतिक्षा सध्या राष्ट्रवादीला आहे.त्यामुळे राष्ट्रवादीने अजून रावेर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारही जाहीर केलेला नाही.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले खडसे कटकारस्थानामुळे आपल्याला मंत्रिमंडळातून काढले,यावर ठाम आहेत.लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी कुणीही एकाच पक्षाचा टिळा लावून आलेला नसतो, असे सूचक विधान करून आपल्या पक्षांतराच्या बातम्यांना हवा दिली होती.खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल होतील,याची राजकीय वर्तुळात दाट शक्यता असल्यानेच राष्ट्रवादी खडसेंच्या निर्णयाची वाट पाहत आहे. कॉंग्रेसने रावेरच्या जागेवर दावा सांगितला आहे.यापूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार दोन वेळेस पराभूत झाला आहे.तरीही राष्ट्रवादीला ही जागा हवी आहे.
खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसेंच्या कामगिरीवर भाजपमध्ये नाराजी आहे.त्याचे भांडवल करून रक्षा खडसे यांना भाजपने तिकीट नाकारले तर स्वत: खडसे नाराज होऊन पक्षांतर करतील, अशी शक्यता आहे. खडसेनी पक्षांतराचा निर्णय घेतील की नाही याचीही शंका आहे.त्यामुळे युतीचा उमेदवार जाहीर होईपर्यंत आघाडीचा उमेदवार जाहीर करायचा नाही, असे दोन्ही कॉंग्रेसने ठरवले आहे.