शिवस्मारक उभारणीबाबत सरकार गंभीर आहे का :शिवसेना

मुंबई नगरी टीम

मुंबई: भाजपवर सामनातून हल्ले करण्याचे शिवसेनेने सुरूच ठेवले असून सामना संपादकीयातून आज पुन्हा भाजपला शिवस्मारकाच्या मुद्यावरून लक्ष्य केले आहे. शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.शिवस्मारकाच्या कामात सतत अडचणी येत आहेत.शिवस्मारकाबाबत सरकार गंभीर आहे का, हा प्रश्न आहे.राज्यात आडवे येईल त्यांना पटकून टाकणाऱ्यांचे राज्य आहे.मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका, असे टीकास्त्र संपादकीयातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे.

गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभा राहिला.तेथे पर्यावरणाची समस्या आली नाही किंवा तांत्रिक अडचणही आली नाही.सवर्णांना दहा टक्के आरक्षण घटनादुरूस्ती करून बहाल केले.तिहेरी तलाकचा मुद्दाही घटनेत बदल करून संपवला.पण अयोध्येत राममंदिर आणि मुंबईच्या समुद्रात शिवस्मारक होत नाही.न्यायालयाची ढाल करून कुणी आडवे येत आहे का, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.

शिवस्मारकाच्या उभारणीत विघ्ने येत आहेत आणि सरकार त्यावर मूग गिळून गप्प आहे,असा आरोपही ठाकरेंनी केला आहे.शिवस्मारक महाराष्ट्राची अस्मिता आहे पण महाराष्ट्राच्या दैवतांबद्दल कोर्टबाजी करून अडचणी निर्माण करण्याचे दुकान काहींनी उघडले असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. शिवराय महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि त्यांच्या स्मारकात राजकारण आणले जाऊ नये. शिवरायांचे स्मारक कोर्टकज्ज्यांत अडकणे लाजिरवाणे आहे.शिवस्मारकाबाबत पर्यावरणाच्या काढलेल्या शंकांचे समाधानही सरकारनेच करायचे आहे,असे ठाकरेंनी म्हटले आहे.

Previous articleछोटा पेंग्विन खुश झाला असेल :  निलेश राणे
Next articleराज ठाकरे यांच्यासाठी’बेस्ट’संप