मुंबई नगरी टीम
जालना: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना मतदारसंघातून दीड लाख मतांनी पराभव होईल.तसे झाले नाही तर मी राजकारण संन्यास घेईन,असे विधान भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले होते.त्यावर शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काकडेंना संन्यास घेण्याची वेळ येणार नाही,असा टोला दानवेंना लगावला आहे.
खोतकर म्हणाले की,काकडे यांचे अंदाज चुकत नाहीत.दानवे दीड लाखच काय पण त्यापेक्षाही जास्त मतांनी हरतील.जालन्यात माझा विजय निश्चित आहे, असे खोतकर म्हणाले.रावसाहेब दानवे आतापर्यंत शिवसेनेमुळेच निवडून आले आहेत.ज्यांनी त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनाच दानवेंनी कायमचे शत्रु बनवून घेतले आहे.या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही,असे आव्हानही त्यांनी दिले.संजय काकडे यांचा राजकीय अभ्यास चांगला असून त्यांचे अंदाज चुकलेले नाहीत,असे खोतकर यांनी म्हटले आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध विकोपाला गेले असल्याचे खोतकर यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवले आहे.काकडे यांच्या भाकितावर दानवे यांनी मात्र अद्यापही काहीही भाष्य केलेले नाही.युतीबाबत अतिम निर्णय होईपर्यंत शिवसेनेशी उघड वाद टाळा अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याने भाजप नेते शिवसेना नेत्यांच्या कसल्याही टीकेवर सध्या मौनच पाळले आहे.