महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरू असतानाच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकाही लोकसभे बरोबरच घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अनौपचारिक विचारणा केली असता महाराष्ट्रात निवडणुका घेण्याची आमच्या यंत्रणेची तयारी असल्याचे या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केंद्रीय  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत नोव्हेंबर २०१९ मध्ये संमाप्त होत आहे. लोकसभेच्या निवडणूका एप्रिल मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र  लोकसभेसोबतच  महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे ठरले तर या दोन्ही निवडणूका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात घ्याव्या लागतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्रित घेण्याचे ठरल्यास राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा असा प्रस्ताव महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने मंजूर करून तो  राज्यपालांकडे व नंतर तो केंद्र सरकारकडे पाठवावा लागेल. केंद्रीय गृहविभागाने राज्यपालांच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या मान्यतेने राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवावा लागेल.  राष्ट्रपतींनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त केल्यानंतरच निवडणूक आयोगा पुढील कार्यवाही सुरू करेल.  राजस्थान, मध्यप्रदेश आदी चार राज्यांच्या निवडणुका डिसेंबर २०१८ मध्ये होण्याचा कार्यक्रम पूर्वनिश्चित होता. परंतु तेलंगणा विधानसभेच्याही निवडणुकाही घेतल्या गेल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुदतीपूर्वीच आपल्या राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यानुसार विधानसभेचे अस्तित्व समाप्त करून नव्या निवडणुकीचा मार्ग केंद्र सरकारने मोकळा करून दिला. तेलंगणा राज्याने केले तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत केले जाईल अशी शक्याता प्रशासकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे संबंध कमालीचे ताणलेले गेले आहे. या दोन पक्षातील वाद हे विधानसभा भंग कऱण्याचे मुख्य कारण असू शकते. तर या दोन पक्षांत तातडीने युती व्हावी यासाठीच लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका  घेतल्या जातील अशी शक्यता आहे. केवळ लोकसभेसाठी नव्हे तर विधानसभेसाठीचेही जागावाटप एकाच वेळी केले जावे तरच युती करू हा शिवसेनेचा आग्रह कायम  आहे.

Previous articleअजित पवारांच्या आव्हानावर गिरीष महाजन यांचे मौन
Next articleनारायण राणेंना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : अशोक चव्हाण