मुंबई नगरी टीम
पेण : केंद्र आणि राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने गेल्या साडेचार वर्षात खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. आता पराभव समोर दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरायला लागली असून, पोलिसांचा वापर करून सरकार विरोधात बोलणा-यांचा आवाज दाबण्यासाठी दडपशाही सुरु आहे. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते इंग्रजांना घाबरले नाहीत. ते मुख्यमंत्र्यांना दडपशाहीला काय घाबरणार? आगामी निवडणुकीत हे फसवणारे, खोटारडे, दडपशाही करणारे सरकार घालवून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. ते पेण येथे जनसंघर्ष यात्रेच्या सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते.
केंद्रातले आणि राज्यातले भाजप शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकार इतकं घाबरले आहे की जनसंघर्ष यात्रेतील प्रत्येक सभा, नेत्यांची भाषणे रेकार्ड करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पेण येथील सभेत पोलिस सर्व नेत्यांचे भाषण रेकार्ड करत होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या पोलिसाकडे विचारणा केली असता आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार रेकॉर्डींग करत असल्याचे त्याने सांगितले सांगितले. पराभव समोर दिसू लागल्यानेच सरकार आता विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे भाषण सरकारचा जातीयवादी, हुकुमशाही चेहरा उघडा पाडणारे होते म्हणून सरकारने आयोजकांवर दबाव आणून त्यांचे निमंत्रण रद्द करायला लावले. मंत्री विद्यार्थ्यांना धमक्या देत आहेत. राज्यातील सूज्ञ जनता ही दडपशाही सहन करणार नसून, येत्या निवडणुकीत भाजपला जागा दाखवली जाईल, असे खा. चव्हाण म्हणाले.
भाजप शिवसेनेने कोकणवासियांची मते घेतली. पण कोकणाच्या विकासासाठी काही केले नाही. मुख्यमंत्री पेण मध्ये येऊन पेण अर्बन बँकेची जमीन सिडकोमार्फत खरेदी करू व ठेवीदारांचे पैसे देऊ असे म्हणाले होते अद्याप सिडकोने जमीन खरेदी केली ना ठेवीदारांचे पैसे मिळाले. पेण अर्बन बँकेत पैसे अडकलेल्या दीड लाखांपेक्षा जास्त खातेदारांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पासाठी शेतक-यांच्या जमीनी घेतल्या पण त्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. हे सरकार शेतक-यांसाठी नाही तर जेएसडब्ल्यूसाठी काम करत आहे. भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून महाराष्ट्राची लूट करत आहेत. या दोन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्राला लुटले असून राज्याच्या दुरावस्थेची जबाबदारी टाळण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत, असे चव्हाण म्हणाले.