मुंबई नगरी टीम
मुंबई: भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का या एकाच प्रश्नाभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे.भाजप वारंवार शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढत असल्याचे चित्र तयार झाले आहे.मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीचा कसला प्रस्ताव? शिवसेना काय मॅरेज ब्युरो आहे का?अशा शब्दांत युतीबाबत चर्चा होत असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
राऊत म्हणाले की,युतीच्या चर्चेच्या प्रस्तावाच्या बातम्या केवळ राजकीय वर्तुळात फिरत आहेत.आमच्यापर्यंत कुणीही आलेले नाही आणि प्रस्ताव स्वीकारायला शिवसेनेने मॅरेज ब्युरो उघडलेला नाही. युतीच्या चर्चेला राऊत यांनी पूर्णविराम दिला असला तरीही दोन दिवसांत चर्चा सुरू होणार असल्याची विश्वसनीय माहितीही माध्यमांना मिळत आहे.
संजय राऊत म्हणाले की,स्वत: शिवसेना पक्षप्रमुख या बातम्यांच्या स्त्रोतांचा शोध घेत आहेत.लोकांचे प्रपोजल स्वीकारायला आम्ही काही मुंडावळ्या बांधून बसलो नाही.शिवसेनेचा मॅरेज ब्युरो नाही.प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवण्याचा निर्णय कॉंग्रेसने योग्य वेळी घेतला आहे,असे राऊत म्हणाले.प्रियांकाकडे पक्षातील पद देणे ही आम्ही घराणेशाही मानत नाही.प्रियांका यांनी राजकारणात यावे,अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्येच भावना आहे.
राऊत यांनी युतीची चर्चा फेटाळून लावली असली तरीही दोन दिवसांत युतीबाबत अधिकृत चर्चा सुरू होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस अधिक जवळ आल्याचे मानले जात आहे.त्यामुळेच युतीबाबत चर्चेच्या बातम्या पसरत आहेत.महाराष्ट्र विधानसभेसाठी शिवसेनेने ५०-५० जागांचा फॉर्म्युला दिला असल्याचे कळते.