मुंबई नगरी टीम
परभणी: मला तुरूंगात डांबल्याबद्दल खंत नाही.खोटे आरोप लावणारे काही संत नाहीत,अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.तुरूंगात टाकल्यावर आमच्या कुटुंबियांचा चौकशीच्या नावाखाली अतोनात छळ करण्यात आला.कपडे सोडून सगळे काही जप्त केले,असाही आरोप त्यांनी केला.
बहुजन जागृती समता मेळावा आज परभणीत झाला.त्यावेळी भुजबळांनी सरकारला फटकारले.भुजबळ कुटुंबाचा नाहक छळ करण्यात आला असून महाराष्ट्र सदन बांधणाऱ्या कंत्राटदाराला एकही रूपया दिलेला नसताना घोटाळा झाला असे कसे म्हणता,असा सवाल त्यांनी सरकारला केला.मला तुरूंगात का टाकले हे मला आणि ज्यांनी टाकले त्यांनाही माहीत नाही,असे भुजबळ म्हणाले.ज्या महाराष्ट्र सदन बांधकामातील घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप करण्यात आले,त्याचे कंत्राट संबंधित ठेकेदाराला विलासराव देशमुख मंत्रिमंडळाने दिले होते.त्या खात्याचा मंत्री एवढीच माझी भूमिका होती.सदन बांधून पाच वर्षे झाली आहेत.माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.तुरूंगात आमचा अतोनात छळ करण्यात आला,असे भुजबळ यांनी सांगितले.
तुम्ही कितीही दादागिरी केलीत तर भुजबळ संपणार नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली.